Saturday, July 07, 2012

फटका - अनंत फंदी

फटका - अनंत फंदी 

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको
चल सालसपण, धरुनी निखालस, खोटा बोला बोलुं नको
अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको
नास्तीतकपणी तूं शिरुनि जनाचा बोल आपणा घेउं नको
आल्या अतिथा मुठभर दाया मागेपुढती पाहू नको
मायबापावर रुसू नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवाहारामधी फसूं नको
परी उलाढाली भलभलत्या पोटासाठी करु नको॥१॥
 
वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसर‌याचा ठेवा, करनी हेवा, झटू नको
मी मोठा शाहणा धनाढ्याही, गर्वभार हा वाहू नको 
एकाहन चढ एक जगामधी, थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गरिब गुरिबांला तूं गुरकावुं नको
दो दिवसाची जाइल सत्ता, अपेश माथां घेउं नको
विडा पैजेचा उचलुं नको
उणी तराजू तोलुं नको
गहाण कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागुं नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको॥२॥
 
उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करु नको
बरी खुशामत शाहणयाचि परी मुर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजीभाकरी, तूपसाखरेची चोरू नको
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधी विटू नको
असल्या गांठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आतां तुज गुजगोष्ट सांगतो. सत्कर्मा तूं टाकुं नको
सुविचारा कातरु नको
सत्संगत अंतरु नको
दैत्याला अनुसरु नको
हरिभजना विस्मरू नको
सत्कीर्ती - नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको॥३॥