Saturday, July 06, 2013

अनामवीरा - कुसुमाग्रज

              आज भारतातील सर्व व्यवस्थावरील जनमानसाचा विश्वास डळमळीत झाला असला तरीसुद्धा एका वर्दीवर अजूनही सर्वांचा मनापासून विश्वास आहे आणि ते म्हणजे "भारतीय सैन्य!" उत्तराखंडमधील महाप्रलय असो किंवा कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याने सतत प्राण पणाला लावून भारतीयांचे रक्षण केले आहे. कर्तव्यासाठी प्राणाचीही पर्वा न करणाऱ्या याच सैनिकासाठी कुसुमाग्रजांची हि कविता  

अनामवीरा, इथे जाहला तुझा जीवनांन्त 
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात 

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशासाठी  
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी 

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा 
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा 

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव 
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव  

जरी न गातील भाट  डफावर तुझे यशोगान 
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान 

काळोखातुनी विजयाचा हे पहाटचा तारा 
 प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युन्जय वीरा 

कुसुमाग्रज