कामाठीपुरा
कॅलेंडरला हेपलून
कित्येक शतकांचा उपदंश देहावर मढवून
निशाचर साळींदर पाहुद्लाय इथं
दिसतं कसं लोभस करड्या गुच्छासारख
स्वप्नातच अविरत दंग दंग
मनुष्य झालाय मुका
त्याचा परमेश्वर बुळगा
या पोकळीला कंठ फुटेल काय?
हवं तर लोखंडी डोळा निगराणीवर ठेव
असेल, तर त्यातलाही अश्रू गोठवून ठेव
त्याचं छकड रूप पाहून सुटतो ताळतंत्र संयमाचा
ते खडबडून होत जाग
बोचकारत काटेरी फण्यान जिव्हारी
ते जखमा करून सोडतं आरपार
रात्र होते उपवर तशी जखमांना फुटतात फुले
फुलांचे पसरतात समुद्र नितांत
नितांताचे नाचत राहतात मैथूनमोर
हा नरक
हा गरगरणारा भोवरा
हे ठणकणारे कुरूप
हि घुंगणारी वेदना
ढाळ, ढाळ, अंगावरली कात एकदा मुळापासून!
सोलून घे स्वतःला
हे विषाक्त सनातन गर्भाशय होऊन जाऊ दे निर्देहि ,
या ढिम्म मांसाच्या गोळ्याला
फुटायला नकोत अवयवांचे धुमारे
हे पोटशियम सायनाईड
घे, घे चव याची !
क्षणाच्या कितीव्या तरी भागावर मरताना
लिहून ठेव अभिप्रेत होत जाणारा निम्न एस.
गोड किंवा खारट
विषाची चव घेण्यास जुंपल्यात इथं रांगा.
शब्दासारखे इथे मरण देखील आले आहे भरून
बस्स , थोड्या वेळात इथे सरी कोसळू लागतील
कामाठीपुरा
सर्व मौसमांना बगलेत मारून
तू फतकलास चिखलात
या छिनाल सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन
मी पाहतो वाट तुझी कमळ होण्याची.
-चिखलातलं कमळ.
-नामदेव ढसाळ
कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ ह्यांच्याविषयी :
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील
पूर (ता. खेड ) गावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचे बालपण गेले. त्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा होती. दलित चळवळीकडे आकर्षित झाले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. नामदेव ढसाळांचे बालपण मुंबईतील गोलपीठा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली.
१९७३ मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला, व त्यानंतर आणखी कवितासंग्रह. 'मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले' हा माओइस्ट विचारांवर आधारित, तर 'प्रियदर्शिनी' हा (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे. तर 'खेळ' हा शृंगारिक कवितांचा संग्रह आहे.
No comments:
Post a Comment