सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
डोळे भरून तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!
काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!
पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
- मंगेश पाडगांवकर
जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांची " सांगा कसं जगायचं " ही कविता जगण्याचा मंत्रच देते.
No comments:
Post a Comment