Showing posts with label marathi kavita. Show all posts
Showing posts with label marathi kavita. Show all posts

Wednesday, October 07, 2015

कामाठीपुरा - नामदेव ढसाळ


कामाठीपुरा 

कॅलेंडरला हेपलून
कित्येक शतकांचा उपदंश देहावर मढवून
निशाचर साळींदर पाहुद्लाय इथं
दिसतं कसं लोभस करड्या गुच्छासारख
स्वप्नातच अविरत दंग दंग

मनुष्य झालाय मुका
त्याचा परमेश्वर बुळगा
या पोकळीला कंठ फुटेल काय?

हवं  तर लोखंडी डोळा निगराणीवर ठेव
असेल, तर त्यातलाही अश्रू गोठवून ठेव
त्याचं  छकड रूप पाहून सुटतो ताळतंत्र संयमाचा
ते खडबडून होत जाग
बोचकारत काटेरी फण्यान जिव्हारी
ते जखमा करून सोडतं  आरपार
रात्र होते उपवर तशी जखमांना फुटतात फुले
फुलांचे पसरतात समुद्र नितांत
नितांताचे नाचत राहतात मैथूनमोर

हा नरक
हा गरगरणारा भोवरा
हे ठणकणारे कुरूप
हि घुंगणारी वेदना

ढाळ, ढाळ, अंगावरली कात एकदा मुळापासून!
 सोलून घे स्वतःला
हे विषाक्त सनातन गर्भाशय होऊन जाऊ दे निर्देहि ,
या ढिम्म मांसाच्या गोळ्याला
फुटायला  नकोत अवयवांचे धुमारे
हे पोटशियम सायनाईड
घे, घे चव याची !
क्षणाच्या कितीव्या तरी भागावर मरताना
लिहून ठेव अभिप्रेत होत जाणारा निम्न एस.

गोड किंवा खारट
विषाची चव घेण्यास जुंपल्यात इथं  रांगा.
शब्दासारखे इथे मरण देखील आले आहे भरून
बस्स , थोड्या वेळात इथे सरी कोसळू लागतील

कामाठीपुरा
सर्व मौसमांना बगलेत मारून
तू फतकलास चिखलात
या छिनाल सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन
मी पाहतो वाट तुझी कमळ होण्याची.
-चिखलातलं कमळ. 

 -नामदेव ढसाळ


 कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ ह्यांच्याविषयी :
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील
पूर (ता. खेड ) गावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचे बालपण गेले. त्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा होती. दलित चळवळीकडे आकर्षित झाले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. नामदेव ढसाळांचे बालपण मुंबईतील गोलपीठा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली.
१९७३ मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला, व त्यानंतर आणखी कवितासंग्रह. 'मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले' हा माओइस्ट विचारांवर आधारित, तर 'प्रियदर्शिनी' हा (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे. तर 'खेळ' हा शृंगारिक कवितांचा संग्रह आहे.

Saturday, September 13, 2014

आई

सतत आपल्या मुलांसाठी झटणाऱ्या आईची महती तसे शब्दात सांगणे कठीणच.. 

आई

आई एक
नाव असतं
घरातल्या घरात
गजबजलेलं
गाव असतं !

सर्वात असते
तेव्हाजाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही,
नाही म्हणवत नाही.

जत्रा पांगते पालं उठतात,
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात,

आई मनामनात तशीच जाते ठेवून काही
जिवाच जिवालाच कळाव असं जाते देऊन काही


आई असतो एक धागा ,
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा,

घर उजळते तेव्हा तीच नसत भान,
विझून गेली अंधारात कि,
सैरावैरा धावायला कमी पडत रान !

 पिकं येतात जातात
माती मात्र व्याकूळच
तिची कधीच भागत नाही तहान
दिसत काहीच नसल डोळ्यांना
तरी खोदत गेलो खोल खोल कि,
सापडतेच अंत:करणातील खाण

आई खरच काय असते
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते,
दुधावरची साय असते,  लेकराची माय असते,

आई असते जन्माची शिदोरी
सारतही नाही अन उरतही नाही.

Monday, March 24, 2014

माझ्या प्रेमा, जगणं सुंदर आहे - मंगेश पाडगावकर

माझ्या प्रेमा,
जगणं  सुंदर आहे;
डोळे भरून
बघणं  सुंदर आहे!

तुझी हाक
तळ्यावरून येते ;
वार्याच्या
मळ्यावरून येते:
थरारून ऐकण
सुंदर आहे;
माझ्या प्रेमा,
जगणं  सुंदर आहे;
डोळे भरून
बघणं  सुंदर आहे!

मातीच्या
ओल्या ओल्या वासात,
वार्याच्या
खोल खोल श्वासात
झाडाच
भिजण सुंदर आहे ;
माझ्या प्रेमा,
जगणं  सुंदर आहे;
डोळे भरून
बघणं  सुंदर आहे!

फुलांचे
वास विरून जातात;
दिलेले
श्वास सरून जातात!
असण्याइतकचं
नसणं सुंदर आहे ;
माझ्या प्रेमा,
जगणं  सुंदर आहे;
डोळे भरून
बघणं  सुंदर आहे!

-  मंगेश पाडगावकर

Tuesday, March 04, 2014

आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आयुष्य जास्त सुंदर वाटत..

चार चौघात बसण्यापेक्षा,
कधी कधी समुद्र किनाऱ्यावर
आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आपल्याला कोण हवंय
यापेक्षा आपण कोणाला हवंय
हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आपल्याला काय मिळालं नाही
हे पाहण्यापेक्षा
आपल्याला काय मिळालयं हे पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहाव
आयुष्य जास्त सुंदर वाटत....!

Wednesday, February 19, 2014

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा - वि. दा. सावरकर


हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा -  वि. दा. सावरकर 

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

कवी : वि. दा. सावरकर 
गायक : लता मंगेशकर 
संगीत : ह्रिदयनाथ मंगेशकर 


Friday, February 14, 2014

प्रेम करणं सोपं नसतं - मंगेश पाडगावकर

प्रेम करणं सोपं नसतं...

सर्व करतात, 
म्हणून करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, 
म्हणून करायच नसतं...


पुस्तकात वाचलं , 

म्हणून करायच नसतं...
तर कुणाकडून ऐकलं, 
म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...


शाळा कॉलेजांत 

असच घडतं..
एकमेकांना बघीतलं की
 मन प्रेमात पडतं...
अभ्यासाच्या पुस्तकात मग
 तिचच रुप दिसतं...

जागेपणी ही मग
 प्रेमाचं स्वप्नं पडतं...
ज्या वयात शिकायचं असतं
 त्यावेळी भलतचं घडतं...

करीयरचं सत्यानाश 
तर आयुष्याचं वाटोळं होतं...
साहजिकचं मग 
आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...

हॉटेल सिनेमागृहात 
नेहमी जावं लागतं...
पैशाचं बजेंट 
नेहमी बनवावं लागतं...
फोन कडे नेहमी 
लक्ष ठेवावं लागतं...

मग जागेपणीही 
स्वप्न दिसायला लागतं...
डोक्याला ताप होऊन 
डोक दुखायला लागतं...
आनंद कमी 
दुःख जास्त भोगावं लागतं...
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं..

- मंगेश पाडगावकर 





Wednesday, January 15, 2014

ती गेली तेव्हा पाऊस रिमझिम - कवी ग्रेस

ती गेली तेव्हा पाऊस रिमझिम - कवी ग्रेस 

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

तशी सांजही आमुच्या दारी, येउन थबकली होती 

शब्दात अर्थ उगवावा, अर्थातून शब्द वगळता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो

त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे

खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

कवी ग्रेस 
गायक : पं. हृदयनाथ मंगेशकर 
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट : निवडुंग 


Thursday, October 24, 2013

ससा तो ससा की कापूस जसा

ससा तो ससा की कापूस जसा

लहानपणी खुपदा ऎकलेलं हे बालगीत ऐकल की, पुन्हा एकदा लहान व्हावासं वाटत.....  


ससा तो ससा की कापूस जसात्याने कासवाशी पैज लाविली,वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली।
चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले।

ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहीयले
वाटेत थांबलेना कोणाशी बोललेना
चालले लुटुलुटु पाही ससा।

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा।
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडच्या सावलीत झोपे ससा।

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
"निजला तो संपला" सांगे ससा।

गीत - शांताराम नांदगावकर

Thursday, August 22, 2013

पाऊस कधीचा पडतो - कवी ग्रेस

पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने,
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती,
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला,
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा,
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा
- कवी ग्रेस

कवी ग्रेस उर्फ  माणिक गोडघाटे 
काव्यसंग्रह : संध्याकाळच्या काविता, राजपुत्र आणि डार्लिंग, सांजभयाचे साजणी, 
चंद्रमाधवीचे प्रदेश 
साहित्य अकादमी पुरस्कार २०११ : वाऱ्याचे हलते रान 

Saturday, July 06, 2013

अनामवीरा - कुसुमाग्रज

              आज भारतातील सर्व व्यवस्थावरील जनमानसाचा विश्वास डळमळीत झाला असला तरीसुद्धा एका वर्दीवर अजूनही सर्वांचा मनापासून विश्वास आहे आणि ते म्हणजे "भारतीय सैन्य!" उत्तराखंडमधील महाप्रलय असो किंवा कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याने सतत प्राण पणाला लावून भारतीयांचे रक्षण केले आहे. कर्तव्यासाठी प्राणाचीही पर्वा न करणाऱ्या याच सैनिकासाठी कुसुमाग्रजांची हि कविता  

अनामवीरा, इथे जाहला तुझा जीवनांन्त 
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात 

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशासाठी  
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी 

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा 
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा 

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव 
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव  

जरी न गातील भाट  डफावर तुझे यशोगान 
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान 

काळोखातुनी विजयाचा हे पहाटचा तारा 
 प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युन्जय वीरा 

कुसुमाग्रज 

Friday, May 03, 2013

एकटा बरा आहे - मंगेश पाडगांवकर

एकटा बरा आहे 
येथ मी खरा अहे 

संगती नको कोणी 
कोवळा झरा आहे 

गुज  सांगती पक्षी ... 
हासरी धरा आहे 

फुलपाखरांची या 
लाडकी तऱ्हा आहे 

शांत या ढगांवरती 
रंग साजरा आहे 

स्पर्श ते नको त्यांचे 
ज्यांवरी चरा आहे 

बोलतो स्वतःशी मी 
शब्द लाजरा आहे
-मंगेश पाडगांवकर

Friday, April 26, 2013

सांगा कसं जगायचं? - मंगेश पाडगांवकर

सांगा कसं जगायचं?

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

डोळे भरून तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!

काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!

पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

- मंगेश पाडगांवकर

जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांची " सांगा कसं जगायचं " ही कविता जगण्याचा मंत्रच देते. 

Friday, April 12, 2013

खाली डोकं, वर पाय! - मंगेश पाडगावकर

जेव्हा तिला वाटत असतं 
तुम्ही जवळ यावं  
जवळ यावं याचा अर्थ 
तुम्ही जवळ घ्यावं !
                अशा क्षणी चष्मा पुसत 
                तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
                व्यमिश्र अनुभूती शब्दांनी तोलत बसला, 
तर काय,
तर काय?
खाली डोकं , वर पाय !!

जेव्हा ती लाजत म्हणते,
"आज आपण पावसात जायचं"
याचा अर्थ चिंब भिजून,
तिला घट्ट जवळ घ्यायचं!
              भिजल्यामुळे खोकला होणार, 
              हे तुम्ही आधीच ताडलत;
              भिजणं टाळून खिशातून, 
              खोकल्याचं औषध काढलतं !
तर काय,
तर काय?
खाली डोकं , वर पाय !!

तिला गुंफायचा असतो, 
याच क्षणी श्वासात श्वास!
अनंततेवर काळाच्या 
तुमचा असतो दृढ विश्वास!
तुम्ही म्हणता थांब जरा!
आणि होता लांब जरा!
            तुम्ही चिंतन करीत म्हणता:
            दोन श्वासामध्ये जे अंतर असतं,
            काळाच्या पकडीत ते, 
            कधीसुद्धा मिळत नसतं!
तर काय,
तर काय?
खाली डोकं , वर पाय !!

भाषेच्या ज्ञानाने तर
तुम्ही महा पंडित असता ,
व्याकरणाचे बारकावे 
त्याचे तुम्ही पंडित असता !!
            ती ओठ जवळ आणते;
            व्याकरणात तुम्ही शिरता,
            ओठ हे सर्वनाम?
            याचा तुम्ही विचार करता!!
तर काय,
तर काय?
खाली डोकं , वर पाय 

-मंगेश पाडगावकर 

Friday, April 05, 2013

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी-मंगेश पाडगावकर

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

सर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे

मिलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

-मंगेश पाडगावकर 

Thursday, March 21, 2013

चिऊताई, चिऊताई दार उघड !-मंगेश पाडगावकर

चिऊताई, चिऊताई दार उघड !
 
चिऊताई, चिऊताई दार उघड !
दार उघड , दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील ?
आपलं मन आपणच खात बसशील ?

वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो,
तसे फाटे असतात !

गाणा~या मैना असतात ;
पांढरे शुभ्र बगळे असतात ;
कधी कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात !

कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील !
तरी सुध्दा या जगात वावरावंच लागतं
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं ?
आपलं सुध्दा आपल्याला
होत असतं पारखं !

मोर धुन्द नाचतो म्हणुन
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकीळ सुंदर गातो म्हणुन
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !

प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फुल असतं ;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मुल असतं !

फुलणा~या या फुलासाठी,
खेळणा~या या मुलासाठी

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळी मधे
काहीसुध्दा घडत नाही !
आपलं दार बंद म्हणुन
कुणाचंच अडत नाही !

आपणच आपला मग
द्वेष करु लागतो !
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो !

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधीत फुलपाखरु नाचत आलं !
चिऊताई ,चिऊताई,
तुला काहीच कळलं नाही !
तुझं घर बंद होतं,
डोळे असुन अंध होतं !

बंद घरात बसुन कसं चालेल?
जगावरती रुसुन कसं चालेल?

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई,चिऊताई दार उघड !

-मंगेश पाडगावकर

Saturday, March 02, 2013

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ? - मंगेश पाडगांवकर


सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून, सुटटी मिळेल काय ?


भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवडयातनं रविवार, येतील का रे तीनदा

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर

गीतकार :मंगेश पाडगांवकर

Thursday, February 14, 2013

भातुकलीच्या खेळामधली - मंगेश पाडगावकर

 भातुकलीच्या खेळामधली

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥


राजा वदला , ``मला समजली शब्दांवाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा ''
कां राणीच्या डोळा तेव्हा, दाटुनी आले पाणी ? ॥१॥


राणी वदली बघत एकटक दूर दुरचा तारा
``उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गांवचा वारा ""
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥


तिला विचारी राजा, `` कां हे जीव असे जोडावे ?
कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?''
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केवलवाणी ॥३॥


कां राणीने मिटले डोळे दूर दुर जाताना ?
कां राजाचा श्वास कोंदला गीत तिचे गाताना ?
वाऱ्यावरती विरुन गेली एक उदास विराणी ॥४॥


गीतकार : मंगेश पाडगावकर 

गायक : अरुण दाते


Friday, February 08, 2013

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा-मंगेश पाडगांवकर

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

-मंगेश पाडगांवकर

Tuesday, January 29, 2013

आम्‍लेट- मंगेश पाडगावकर

कोंबडीच्‍या अंड्यामधून
बाहेर आलं पिल्‍लू ;
अगदी होतं छोटं
आणि उंचीलाही टिल्‍लू !
कोंबडी म्‍ह्‍णाली," पिल्‍लूबाळ,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे ;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे !
पिल्‍लू म्‍ह्‍णाले," आई,
दुसरे नको काही,
छोट्याशा कपामध्‍ये चहा भरुन दे ,
मला एका अंड्याचे आम्‍लेट करुन दे !

- मंगेश पाडगावकर

Saturday, January 19, 2013

मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं - मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं,
सोनेरी गिरक्या घेत, 
मनात गाणं नाचत सुटलं.......

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं मन असं जडलं........

तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवून झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...

ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या..
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

मग एक दिवस,

चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरीसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोस्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......

पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं
  -मंगेश पाडगांवकर 

कवी मंगेश पाडगांवकर यांच्याविषयी काही..

मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला) हे मराठी कवी आहेत. सलाम या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते.

 

विशेष प्रसिद्ध कविता

  • अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
  • फिदी फिदी हसतील ते?
  • दार उघड , दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड !
  • आम्लेट
  • जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
  • मी बोलले न काही नुसतेच पाहिले
  • सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला
  • सलाम
  • फ़ूल ठेवूनि गेले
  • सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

     गौरव

  • अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, इ.स. २०१०
  • अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (इ.स. २०१०)

पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०) : सलाम कवितासंग्रहासाठी
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार