Tuesday, January 29, 2013

आम्‍लेट- मंगेश पाडगावकर

कोंबडीच्‍या अंड्यामधून
बाहेर आलं पिल्‍लू ;
अगदी होतं छोटं
आणि उंचीलाही टिल्‍लू !
कोंबडी म्‍ह्‍णाली," पिल्‍लूबाळ,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे ;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे !
पिल्‍लू म्‍ह्‍णाले," आई,
दुसरे नको काही,
छोट्याशा कपामध्‍ये चहा भरुन दे ,
मला एका अंड्याचे आम्‍लेट करुन दे !

- मंगेश पाडगावकर

Saturday, January 19, 2013

मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं - मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं,
सोनेरी गिरक्या घेत, 
मनात गाणं नाचत सुटलं.......

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं मन असं जडलं........

तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवून झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...

ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या..
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

मग एक दिवस,

चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरीसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोस्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......

पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं
  -मंगेश पाडगांवकर 

कवी मंगेश पाडगांवकर यांच्याविषयी काही..

मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला) हे मराठी कवी आहेत. सलाम या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते.

 

विशेष प्रसिद्ध कविता

  • अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
  • फिदी फिदी हसतील ते?
  • दार उघड , दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड !
  • आम्लेट
  • जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
  • मी बोलले न काही नुसतेच पाहिले
  • सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला
  • सलाम
  • फ़ूल ठेवूनि गेले
  • सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

     गौरव

  • अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, इ.स. २०१०
  • अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (इ.स. २०१०)

पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०) : सलाम कवितासंग्रहासाठी
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार

Friday, January 18, 2013

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं


Wednesday, January 09, 2013

समर्थ रामदास यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची केलेली स्तुती

समर्थ रामदास यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची केलेली स्तुती 
समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरु शिष्याची जोडी सर्वज्ञात आहे.
समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला आपल्या कर्तृत्वाने घडवले, त्याला एक नवी ओळख करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महतीचे वर्णन समर्थ रामदासानी खालील शब्दात केले आहे.

निश्चयाचा महामेरू ! बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी
यशवंत, कीर्तिवंत ! सामर्थ्यवंत, वरदवंत 
पुण्यवंत, नीतिवंत ! जाणता राजा


शिवरायाचे आठवावे रूप ! शिवरायाचा आठवावा प्रताप 
 शिवरायाचा आठवावा साक्षेप ! भूमंडळी
शिवरायाचे कैसे  बोलणे ! शिवरायाचे कैसे चालणे 
शिवरायाचे सलगी देणे ! कैसी असे

सकळ सुखाचा केला त्याग ! करुनी साधिजे तो योग 
राज्यसाधनाची लगबग! कैसी केली

- समर्थ रामदास