Friday, April 26, 2013

सांगा कसं जगायचं? - मंगेश पाडगांवकर

सांगा कसं जगायचं?

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

डोळे भरून तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!

काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!

पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

- मंगेश पाडगांवकर

जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांची " सांगा कसं जगायचं " ही कविता जगण्याचा मंत्रच देते. 

Friday, April 12, 2013

खाली डोकं, वर पाय! - मंगेश पाडगावकर

जेव्हा तिला वाटत असतं 
तुम्ही जवळ यावं  
जवळ यावं याचा अर्थ 
तुम्ही जवळ घ्यावं !
                अशा क्षणी चष्मा पुसत 
                तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
                व्यमिश्र अनुभूती शब्दांनी तोलत बसला, 
तर काय,
तर काय?
खाली डोकं , वर पाय !!

जेव्हा ती लाजत म्हणते,
"आज आपण पावसात जायचं"
याचा अर्थ चिंब भिजून,
तिला घट्ट जवळ घ्यायचं!
              भिजल्यामुळे खोकला होणार, 
              हे तुम्ही आधीच ताडलत;
              भिजणं टाळून खिशातून, 
              खोकल्याचं औषध काढलतं !
तर काय,
तर काय?
खाली डोकं , वर पाय !!

तिला गुंफायचा असतो, 
याच क्षणी श्वासात श्वास!
अनंततेवर काळाच्या 
तुमचा असतो दृढ विश्वास!
तुम्ही म्हणता थांब जरा!
आणि होता लांब जरा!
            तुम्ही चिंतन करीत म्हणता:
            दोन श्वासामध्ये जे अंतर असतं,
            काळाच्या पकडीत ते, 
            कधीसुद्धा मिळत नसतं!
तर काय,
तर काय?
खाली डोकं , वर पाय !!

भाषेच्या ज्ञानाने तर
तुम्ही महा पंडित असता ,
व्याकरणाचे बारकावे 
त्याचे तुम्ही पंडित असता !!
            ती ओठ जवळ आणते;
            व्याकरणात तुम्ही शिरता,
            ओठ हे सर्वनाम?
            याचा तुम्ही विचार करता!!
तर काय,
तर काय?
खाली डोकं , वर पाय 

-मंगेश पाडगावकर 

Friday, April 05, 2013

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी-मंगेश पाडगावकर

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

सर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे

मिलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

-मंगेश पाडगावकर